हृदयद्रावक घटना! नागावमधील स्विमिंग पूलमध्ये सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील नागाव येथे सहा वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 19) दुपारी घडली आहे. चिमुकल्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित चंद्रकांत पाटील (32) रा. आंबेपूर मल्याण, ता. अलिबाग, जि. रायगड हे त्यांची पत्नी अस्मिता, मुलगा रिशांक आणि मेहुणीसह नागाव येथे मित्र स्वप्नील वसंत शिंदे यांच्या खासगी स्विमिंग पूलवर गेले होते. सहलीचा आनंद घेत सर्व जण काही वेळ स्विमिंग पूलमध्ये पोहत होते. त्यानंतर कपडे बदलण्यासाठी सर्वजण रूममध्ये गेले. रोहित पाटील कपडे बदलण्यासाठी आत गेले असताना त्यांचा मुलगा रिशांक काही वेळ बाहेरच थांबला होता. मात्र, काही क्षणातच तो नजरेआड झाला. कपडे बदलून बाहेर आल्यानंतर रोहित पाटील यांनी मुलाचा शोध घेतला असता तो कुठेच दिसून आला नाही. अखेर स्विमिंग पूलमध्ये पाहिले असता रिशांक हा पूलच्या तळाशी बुडालेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात येताच तातडीने त्याला पाण्याबाहेर काढून तात्काळ जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, सुमारे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नागाव परिसर हादरला आहे. आनंदाच्या क्षणातच काळाने झडप घालत एका निष्पाप जीवाचा बळी घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Exit mobile version