दिवेआगर येथील घटना; कुटुंबावर शोककळा
| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
एका चार वर्षीय चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना दिवेआगर येथे घडली आहे. आविष्कार असे या मुलाचे नाव आहे. आई-वडिलांची नजर चुकवून तो स्विमिंग पूलमध्ये गेला, त्यात त्याचा दुर्दैवीरित्या अंत झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून दिवेआगर येथे एक कुटुंब फिरण्यासाठी आले होते. येथील एक लॉजवर ते वास्तव्यास होते. दरम्यान, बाहेरुन फिरुन आल्यानंतर गाडीतून काहीतरी वस्तू घेत मुलाला आपल्याबरोबर चल असे म्हणत आई-वडील रुममध्ये गेले. परंतु, मुलगा आपल्यासोबत आलेला नाही, हे त्यांच्या लक्षात आले नाही. दरम्यानच्या काळात चिमुकला आविष्कार लॉजमध्ये असणाऱ्या स्विमिंग पूलजवळ गेला असता तो पाण्यात पडला. त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. पालकांना आपला मुलगा आपल्याबरोबर नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी शोधाशोध केली, परंतु, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
या घटनेची नोंद दिघी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. अधिक तपास एपीआय डॉ. प्रसाद ढेबे करीत आहेत.
मुलांची जबाबदारी महत्त्वाची
पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटताना लहान-मोठी मुले सोबत असतील तर ती महत्त्वाची जबाबदारी ओळखून आनंद घ्यावा, नाहीतर आविष्कारसारखे दुःख आपल्याही नशिबी येऊ शकते, असे पडखर मत येथील स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.