सामन्यात 2 शतके अन् 2 द्विशतके
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा मोठ्या फरकाने पराभव केला. सुमारे साडेचार दिवस चाललेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज संघाला 164 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना 152.4 षटकांत 598/4 धावांवर पहिला डाव घोषित केला. कांगारूकडून मार्नस लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी द्विशतके झळकावली, तर ट्रॅव्हिस हेड 99 धावांवर बाद झाला. वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात 98.2 षटके खेळून 283 धावांत आटोपला. त्यामुळे वेस्टइंडिज पहिल्या डावाच्या आधारे 315 धावांनी पिछाडीवर होता.
ऑस्ट्रेलियाने दुसर्या डावात 37 षटकात फलंदाजी करताना 2 गडी गमावून 182 धावा केल्या. यात मार्नस लबुशेनच्या शतकाचाही समावेश आहे. अशाप्रकारे वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 498 धावांचे लक्ष्य दिले, परंतु कॅरेबियन संघ 333 धावांत गारद झाला आणि 164 धावांनी सामना गमावला. कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने 110 धावांची खेळी खेळली, पण ती काही कामी आली नाही.