मुरूड तालुक्यात दमदार पाऊस


150 मिमी पाऊस; भाताचे राब पाण्याखाली
। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
गेल्या आठवडाभर कमी जास्त पडणार्‍या पावसाने मंगळवार रात्रीपासून जोरदार पडायला सुरुवात केली असून बुधवारी देखील पावसाचा जोर कायम होता. पहाटे पासून मुसळधार पाऊस सुरु असून 12 तासात 150 मिमी पाऊस पडल्याची माहिती तहसील सूत्रांनी दिली. दरम्यान लावलेले भाताचे राब पाण्याखाली गेल्याने कुजून मोठे नुकसान होण्याची माहिती मुरूड तालुक्यातील वाणदे या गावातील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पाटील यांनी दिली.

या परिसरात काही दिवसांपूर्वी भात पेरणी करण्यात आली होती. त्यानंतर छोटे राब वर आले होते. पावसाने हे राब पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. परिसरात शिघ्रे नदी देखील भरून वाहू लागली आहे. आंबोली धरणातील पाणी देखील या नदीला मिळत असल्याने शेत जमिमितील पातळीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच खेटून असलेल्या एकदरा, मुरूड समुद्र खाडीतील पाणी भरतीमुळे घुसल्याने पाणी पातळी वाढली आहे. गोडे पाणी आणि खाडीचे खारे पाणी यामुळे भात शेतीला आणखी एक धोका निर्माण झाल्याचे दिसून आले. बुधवारी मुसळधार पाऊस पडत असल्याने मुरूड मधील जनजीवन विस्कळीत झाले होते.

Exit mobile version