दिघी जलवाहतूक बंद
| दिघी | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यात चार दिवस संततधार पावसाने लहान-मोठे रस्ते बंद पडत आहेत. मात्र, सोमवारी रात्रीपासून वादळी पावसाची जोरदार सुरुवात झाल्याने वेळास-आदगाव मार्गावर दरडी कोसळण्याची घटना घडली आहे. वादळी पावसामुळे दिघी ते आगरदांडा ही प्रवासी जलवाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे बोर्लीपंचतन शहराला जोडणारे मार्ग पाण्याखाली येत असताना सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी वेळास मार्गावर डोंगरावरील मोठा ओसरा दगडांसह खाली रस्त्यावर आल्याने रात्रीच्या अंधारात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. पुढे अनुचित प्रकार घडू नये व वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून महसूल मंडळाधिकारी सुनील पाटील तसेच दिघी सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी वेळेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच्या वेळी दगड हटवण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नसल्याने शेवटी अंधारात चाचपडत स्वतःच हाताने दगड हटवण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले. वेळीच दखल घेतल्याने प्रवासी वर्गाला दिलासा मिळाला आहे.
