पर्यटकांचा हिरमोड; जलवाहतूक व्यावसायिकांना फटका
। कोर्लई । प्रतिनिधी ।
गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण वादळ वारा व विशेषतः सायंकाळी वीजांच्या कडकडाटात पडणारा पाऊस यामुळे जंजिरा किल्ला बंद ठेवण्यात आला आहे. दिवाळीच्या सुट्टीत आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला असून, याचा पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या जलवाहतूक व्यावसायिकांना फटका बसला आहे. कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, भारतीय हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. आज सकाळच्या वेळेत मुरुड मध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले, पावसाने शिंपण घालायला सुरुवात केली असल्याचे तर काही ठिकाणी ऊन पावसाचे चित्र दिसून येत होते.
मुरुड- जंजिरा किल्ला पाहण्यासाठी खोरा बंदर, राजपुरी बंदर, दिघी बंदर या ठिकाणाहून जलवाहतूक सुरु असते. दिवाळी सणात आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची रेलचेल दिसून येत होती, मुरुड मधील सर्व हॉटेल्स लॉज हाऊसफुल्ल झाली आहेत. अवकाळी पावसामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले. अचानक आलेल्या या पावसामुळे बंदर खात्याने जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेकांना जंजिरा किल्ला पाहाता आला नाही. दुपार नंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली, अवकाळी पावसामुळे शेतात कंपनी करून ठेवलेला भात, मळण्या भिजल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.





