| खानिवडे | प्रतिनिधी |
वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसाने पिवळ्या सोन्यासारखी भाताच्या कणसांनी बहरलेली उभी भातशेती शेतातील चिखलात झोपवली. यंदा वर्षातील पाच महिन्यांहून अधिक बरसात करणाऱ्या पावसामुळे आधीच हलवार पिकांचे नुकसान झेलणाऱ्या शेतकऱ्यांना वारंवार येणाऱ्या आस्मानी संकटामुळे चिंतेने ग्रासले आहे. त्यात वसई तालुक्याला शासनाने नुकसान भरपाई पासून वागळल्याने शासन मदत देईना आणि देव दिलेले ठेवेना अशी म्हणण्याची पाळी आल्याचे शेतकरी सांगत आहेत.
वसईच्या पूर्व व पश्चिम भागात तालुक्याचे खरिपातील मुख्य पीक असलेल्या भात शेतीची लागवड करण्यात आली होती. यामध्ये कमी दिवसांचे हलवार पीक हंगामातील आपल्या वेळेत पूर्णपणे पिकून काढणीला आले होते. मात्र, लांबलेल्या पावसाने या हलवार पिकांची नासधूस केली. तर निम गरवार व गरवार पिकांच्या भाताची कणसे चांगल्याप्रकारे कापणीसाठी तयार झाली होती. त्यात मागील काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे आणि हवामानाचा कोणताही अंदाज न मिळाल्यामुळे काहींनी कापणीसाठी ही सुरवात केली होती.
मात्र, दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वसईच्या काही भागात पावसाने वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने कापणीसाठी तयार झालेली भात शेती आडवी झाली. तर कापणी केल्यानंतर शेतात सुकविण्यासाठी पसरलेली भात पिके भिजून गेल्याने नुकसान झाले आहे. यंदा पावसाचे सावट काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही अधूनमधून अवकाळी पाऊस सुरूच आहे. त्याचा मोठा परिणाम भात शेतीवर होऊ लागला आहे. जर पावसाचे सत्र असेच सुरू राहिले तर जे काही उत्पादन निघाले आहे ते सुद्धा वाया जाईल असे शेतकऱ्यानी सांगितले आहे. सई तालुक्यात जोरदार पाऊस शेतकऱ्याचे अत्यंत नुकसान झाले असून शेतकऱ्यांना ऐन दीपावलीत संकटाला सामोरे जावे लागत आहे.






