Raigad Rain Updates: रायगडात मुसळधार पावसाचा हाहाकार! रेड अलर्ट कायम

प्रशासन सतर्क; अंबा नदी धोक्याच्या पातळीवर

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यात गेल्या अनेक तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्हाभरात सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहेत.


सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या, ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. विशेषतः अंबा नदीने धोक्याची पातळी गाठल्याने नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी शेती क्षेत्रात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नागोठणे परिसरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. महामार्गावरील परिस्थिती लक्षात घेता वाहतूक विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून सातत्याने पाहणी सुरू असून वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी, नाले, धबधबे, समुद्रकिनारे आणि दरडप्रवण भागांपासून दूर राहावे. तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचेही त्यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात पुढील 24 ते 48 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने प्रशासनासह नागरिकांचे लक्ष आता नदीपात्रांच्या पाणीपातळीवर आणि संभाव्य पूरस्थितीकडे लागले आहे.

नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
महाड, पोलादपूर, माणगाव, रोहा, सुधागड आणि इतर पूरप्रवण भागांमध्ये प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन महाड व पोलादपूर तालुक्यातील बाराशेहून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. शाळा, ग्रामपंचायत कार्यालये आणि अन्य सुरक्षित इमारतींमध्ये तात्पुरत्या निवारा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
आंबेनळी घाट चार दिवस बंद
सततच्या पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढल्याने पोलादपूर–महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट दि.3 जुलै ते 6 जुलैपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. घाट परिसरात यापूर्वी अनेकवेळा दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या असून यंदाही काही ठिकाणी माती घसरल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे.
सतर्क राहण्याचे निर्देश
जिल्ह्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदत पोहोचविण्यासाठी एनडीआरएफचे पथक महाड येथे तैनात करण्यात आले आहे. बचाव नौका, जीवनरक्षक साहित्य, वैद्यकीय पथके तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात असून तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी आणि ग्रामस्तरावरील यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Exit mobile version