पुढील चार दिवस पाऊस बरसणार
| खास प्रतिनिधी | रायगड |
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा बरसण्यास सुरुवात केली आहे. 25 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. 26 आणि 27 रोजी ऑरेंज अलर्ट, तर 28 ऑगस्टला यलो अलर्ट असल्याने नागरिकांनी, तसेच संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
जून आणि जुलै महिन्यात दमदार पाऊस बरसला होता. त्यामुळे विविध नद्या दुथडी भरुन वाहत होत्या. महाड, पेण, पाली, कर्जत, पनवेल या ठिकाणच्या नद्यांना महापूर आला होता. त्यामुळे हजोरो नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले होते. जुलै महिन्यात पावसाने चांगलाच हाहाकार माजवला होता. ठिकठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे सर्वत्रच जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर पावसाने ऑगस्ट महिन्यामध्ये काही कालावधीसाठी विश्रांती घेतली होती. पावसाने पुन्हा तडाखा देण्याचे मनसुबे शुक्रवारपासूनच दाखवले आहेत. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 24, 25 रोजी रेड अलर्ट दिला आहे. 26 आणि 27 रोजी ऑरेंज अलर्ट, तर 28 ऑगस्टला यलो अलर्ट दिला आहे.