। रायगड । प्रतिनिधी ।
जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून नद्या, तलाव, विहिरींची पातळी वाढली आहे. ठिकठिकाणी सखल भागातही पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. हवामान विभागाने दोन जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अलिबागसह रोहा, माणगाव, पनवेल, श्रीवर्धन, म्हसळा या तालुक्यांमध्ये 489 मिमीपासून 551 मिमी तर कर्जत, उरण, खालापूर, पेण या तालुक्यांमध्ये 214.3 मिमीपासून 383.8 मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने 2 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. या कालावधीत विनाकारण घरातून बाहेर पडू नये, विजेच्या अथवा झाडाच्या बाजूला थांबू नये. सखल भागात साचलेल्या पाण्याचा अंदाज घेऊनच वाहन चालवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
98 हजार हेक्टरवर भातलागवड
भाताची रोपे लावणी योग्य झाली होती, मात्र पावसाअभावी लावणीची कामे खोळंबली होती. अखेर पावसाची जोरदार बरसात सुरू झाल्याने शेतकरी सुखावला आहे. भातलावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सुमारे 98 हजार हेक्टर क्षेत्रात भातलागवड केली जाणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.