अतिपावसाचा भातशेतीला फटका

तालुक्यात तयार भातपीक पाण्याखाली
शनिवार, रविवारी पावसाची विश्रांती

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मुरूड तालुक्यात गेले दोन-तीन दिवस धुमाकूळ घालणार्‍या पावसाने शनिवारी सकाळपासून विश्रांती घेतली आहे. रविवारीदेखील दुपारी कडकडीत ऊन पडले होते. मात्र, त्याआधी दोन दिवस सुमारे 160 मि.मी. पडलेल्या पावसाने भातशेतीची पुरती वाट लावून टाकली आहे. सद्यःस्थिती भातपीक पाण्याखाली गेले असून, पाऊस अधिक पडल्यास ते वाया जाण्याची भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे.

परतीच्या पावसाने भातशेती अक्षरशः पाण्यात लोळण घेत असल्याचे वाणदे गावाजवळ पाहायला मिळाले. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या जोरदार पावसाने वाणदे येथील नंदकुमार ठाकूर यांच्या जमिनीत तयार झालेले पीक पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी शेतजमिनीत तयार भात शेतीची रोपे तरंगताना दिसून येत होती.
शिघ्रे गावचे शेतकरी आणि स्टॅम्प वेंडर रघुनाथ माळी यांनी सांगितले की, परिसरातील भातशेती तयार झाल्याने लवकरच कापणी होणार होती; परंतु पावसाने तोंडचा घास हिरावून घेतला आहे. श्री. माळी यांनी सांगितले की, केवळ भातशेतीच नाही, तर नाचणी, वरी या पिकांनादेखील धोका पोहोचला आहे. गेले तीन दिवस बेफाम पाऊस पडल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

Exit mobile version