जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका

अनेक ठिकाणी घरांची पडझड
महामार्ग खड्ड्यात; वाहतुकीचा खोळंबा

| सुकेळी | वार्ताहर |

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रोहा, सुधागड, पेण, माणगाव, अलिबाग, उरण या सर्वच तालुक्यांना पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गावर या प्रचंड पावसामुळे मोठ्या प्रमाणात दगड-गोठे, चिखल तसेच भयानक खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडीदेखील झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

या मुसळधार पावसामुळे महामार्गावर जणू काही चिखलाच्या तलावाचे स्वरूप आल्याने यामधून वाट काढताना वाहनचालकांची दमछाक होत आहे. या मुसळधार पावसामुळे गणेशोत्सव काळात मोठमोठे दगड-गोठे टाकून भरलेले खड्डे पूर्णतः उखडले गेले आहेत. वाकण ते सुकेळी यादरम्यानच्या अंतरामध्ये तर तीन ते चार फुटांचे खड्डे पडले आहेत. या दरम्यान रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, वाहनचालकांना तसेच प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे कंबरडे मोडले असून, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसानदेखील होत आहेत.

गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याचा मोठा गाजावाजा करत ज्या ज्या ठिकाणी खडी व मातीने जे खड्डे भरले होते, ती निकृष्ट दर्जाची वापरण्यात आली होती, असा आरोप प्रवासी व वाहनचालकांकडून होत आहे. त्यामुळे प्रशासन अजून किती जणांचा बळी जाण्याची वाट पाहात बसणार, असा प्रश्‍न वाहनचालक व प्रवाशांतून होत आहे.

Exit mobile version