मुसळधार पावसाचा फटका

जनजीवन विस्कळीत, लाखोचो नुकसान

। अलिबाग । प्रतिनिधी ।

जिल्हाभरात रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. याशिवाय गाय, शेळ्यामेंढ्यासह बकर्‍या या पशुधनाची मोठी हानी झाली असून, 25हून अधिक घरांसह दहा गोठ्यांची पडझड होऊन नुकसान झाले. रस्ते खचले, शेतांमध्ये पाणी साचल्याने भातांच्या रोपांसह बांधबंदिस्तीदेखील नुकसान झाले आहे. पुलांना भगदाड पडल्याने अनेक गावांचा, वाड्यांचा संपर्क तुटला. त्यामुळे रविवारचा पाऊस लाखोंची हानी करणारा ठरला.

मागील चोवीस तासामध्ये जिल्ह्यातील म्हसळ्यामध्ये 227 मि.मी., मुरूडमध्ये 215 मि.मी., अलिबागमध्ये 180 मि.मी., तळामध्ये 167 मि.मी., उरणमध्ये 150 मि.मी., रोहामध्ये 115 मि.मी., खालापूरमध्ये 91 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. रविवारपासून सुरु असलेल्या पावसामुळे नद्यादेखील पाण्याने भरल्या आहेत. मात्र, अंबा नदीसह काही प्रमुख नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे. या अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान झाले आहे. त्यात 13 कच्ची, तर 11 पक्क्या घरांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, पेण तालुक्यातील गावांमध्ये पाणी शिरले. या पाण्यात घरातील विजेच्या उपकरणांसह धान्य वाहून गेले. बामणगाव येथील गोठ्यावर पिंपळाचे झाड कोसळल्याने प्रचंड नुकसान झाले. तेथील पशुधनाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. जिल्ह्यातील आठहून अधिक गोठ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील तीन मोठ्या जनावरांसह दोन शेळ्या, 25 कोंबड्यांची मोठी हानी झाली आहे.

पंचनाम्याची कारवाई सुरू
रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील घरांसह शेती, गोठे आदींचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही महसूल व कृषी विभागामार्फत सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार यंत्रणा कामाला लागली आहे.
सोशल मीडियाचा आधार
अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांसह नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची माहिती तातडीने मिळविण्यासाठी प्रशासनाने सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. कोतवाल, तलाठ्यांमार्फत सोशल मीडियावर मेसेज करून नुकसान झालेल्या व्यक्तींची नावे नावे पाठविण्याचे काम सुरु केेले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांची माहिती तात्काळ मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
शेतकर्‍यांनी अशी काळजी घ्यावी
भातपिकाची लागवड रायगड जिल्ह्यात सर्वत्र सुरु आहे. शेतकर्‍यांनी त्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतातून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
अतिपावसात रोपांची लागवड टाळावी.
शेतालगतचे नाले मोकळे करून पाणी जाण्याचा मार्ग करावा.
भातरोपे दोन दिवसांपर्यंत पाण्यात सापडल्यास पाण्याचा ओघ कमी झाल्यानंतर दाणेदार युरियाचा हलकासा हप्ता द्यावा.
30 दिवसांपेक्षा जास्त वयांची रोपे लागवड करावयाची असल्यास प्रत्येक चुडामध्ये रोपांची संख्या वाढवावी.
पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधण्यात यावे.
कुक्कुटपालनाच्या ठिकाणी हवामान ऊबदार राहण्यासाठी विजेचे बल्ब लावण्याची व्यवस्था करावी.
Exit mobile version