| माथेरान | वार्ताहर |
माथेरान शहरात देखील मुसळधार पाऊस बरसत असून दिवसात माथेरानमध्ये 398 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत 2709 मिमी पाऊस पडला आहे. पावसाचा तडाखा पर्यटकांनाही बसला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने 2005 ची पुनरावृत्ती होते की काय,अशी भीती येथे नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. शहरात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे बुधवारी, गुरुवारी परिसरातील शाळा बंद करण्यात आल्या तर काही व्यापाऱ्यांनी दुकानेही बंद ठेवली होती. काही ठिकाणी झाडे पडण्याच्या किरकोळ घटना घडल्या असल्या तरी कोणताही अनुचित प्रकार असा घडलेला नाही.
माथेरानमध्ये दाखल झालेले पर्यटक शार्लोट तलाव पाहण्यासाठी आवर्जून जात असतात. त्यामुळे येथील अतिवृष्टीत सुरक्षेचा उपाय म्हणून तहसीलदार तथा अधीक्षक दिक्षांत देशपांडे यांनी आपदा मित्र यांच्या समवेत नियोजन करून तलाव परिसरात कर्मचारी तैनात केले आहेत. वॉटर पाईप स्टेशनच्या खालच्या बाजूला पहाटे दरड कोसळण्याची घटना घडली आहे.त्यामुळे काही वेळेसाठी घाट रस्ता बंद ठेवण्यात आला होता. आता मात्र घाट रस्ता येथे सुरळीत सुरू आहे , परंतु येथे परतीच्या प्रवासाला लागलेल्या पर्यटकांना थोडाफार त्रासाला सामोरे जावे लागले.