| पनवेल | वार्ताहर |
सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबई विमानतळ बाधित डुंगी गाव, पारगावमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. डुंगी गावातील ग्रामस्थांचे सिडकोने तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केल्याने कोणती दुर्घटना घडली नाही. गेल्या चार वर्षापासून पनवेल जवळील डुंगी गावात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरावामुळे गावात पाणी साचते. सिडकोने तात्पुरत्या स्वरूपात पावसाळी स्थलांतर केल्याने गावात कोणी राहत नाही त्यामुळे साचलेल्या पाण्यामुळे कोणती दुर्घटना झाली नाही, परंतु या भरावाचा परिणाम जवळच असलेल्या पारगाव गावाला झाला. या गावातील तारेकर आळीमध्ये पाणी साचले. जवळजवळ चार फूट पाणी साचले, त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. पूर परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थ, कुटुंबही घाबरले. घरातील वस्तूंचे अतोनात नुकसान होत आहे, याबाबत सिडकोला सांगून सुद्धा सिडको कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची भरपाई दिली जात नाही. सिडकोकडून डुंगीतील कुटुंबीयांना तात्पुरत्या स्थलांतरासाठी 50 हजार रुपये दिले जातात. सिडको ज्याप्रमाणे डुंगी गावातील कुटुंबांनां मदत करते त्याप्रमाणे पारगाव गावातील कुटुंबाला मदत करावी अशी मागणी समाजसेवक बाळाराम नाईक यांनी केली आहे.