नेपाळमध्ये पावसाचे थैमान

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

नेपाळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. भूस्खलन आणि पुरामध्ये नेपाळमध्ये कमीत कमी 112 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये गुरुवारपासून पाऊस धुमाकूळ घालत आहे. अनेक भागात जोरदार पाऊस बरसत आहे. आतापर्यंत 3000 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. अनेक शहरांमध्ये पाणी साचलं आहे. सध्या देशातील 63 ठिकाणचे राष्ट्रीय महामार्ग ब्लॉक झाले आहेत. नेपाळमध्ये अनेक भागात विजेचा पुरवठा खंडित झाला आहे.

दरम्यान, काटमांडूमधील 226 गावे पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे नेपाळमधील सर्व शाळा तीन दिवस बंद ठेवण्याचे आणि नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. नेपाळमधील मुसळधार पावसामुळे बिहार सरकारने राज्याच्या उत्तर भागात पुराचा धोका जाहीर केला आहे. नेपाळमधील पावसामुळे बिहारमध्ये वाहत येणार्‍या गंडक, कोसी, महानंदा आणि इतर नद्यांचा प्रवाह वाढला आहे. याचा फटका बिहारमधील 13 जिल्ह्यांना बसला असून, यामुळे 1,41,000 लोक प्रभावित झाले आहेत. पश्‍चिम चंपारन, पूर्व चंपारन, शिवहर, गोपालगंज, शिवन, सितामर्ही, अरारिया, क्रिष्णकुंज, पुर्णिया, सुपौल, मधेपुरा, मुजफ्फरपुर आणि मधुबनी या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. प्रशासनाने मदतकार्य सुरु केले आहे.

Exit mobile version