धाटाव रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा
| धाटाव | वार्ताहर |
मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर रत्नागिरी, रायगडसह रोह्यातसुद्धा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अधून मधून विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह दाखल झालेल्या पावसाने सर्व परिसर ओला चिंब करून टाका आहे. मात्र, झाडांच्या खाली माती भुसभुशीत होऊन काही ठिकाणी झाडे उन्मळून पडत आहेत. असाच एक प्रकार रोह्यात धाटाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यावर मध्यरात्री झाड उन्मळून कोसळले.
झाड अचानक रस्त्याच्या मधोमध उन्मळून पडल्याने मलखंडवाडी, महादेववाडी बाजूकडील रहदारी ठप्प झाली. दरम्यान, या घटनेमुळे अवजड वाहनांसह, टँकर, चारचाकी वाहने रस्ता बंद झाल्यामुळे वाहतूक कोंडीसुद्धा झाली नाही. सुदैवाने या घटनेत जीवितहानी मात्र टळली. पहाटे पहिल्या पाळीत कामावर जाणाऱ्या कामगारांना रस्त्यात पडलेल्या आडव्या झाडामुळे पर्यायी रस्ता निवडावा लागला. तर यामुळे अनेकांना कामावर उशिरा जावे लागले तर रात्र पाळीत काम करणाऱ्या कामगारांनासुद्धा येथे झालेल्या वाहतून कोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान, धाटाव येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी याठिकाणी तत्परता दाखवीत हे झाड तासाभरात बाजूला केले. अखेर या रस्त्यावरील वाहतूक पूर्वपदावर आणण्यात आली. औद्योगिक वसाहतीतील कामगारवर्गाने अग्निशामक दलाच्या जवानांच्या कामाचे कौतुक केले.