घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले
गडब | वार्ताहर |
पेण तालुक्याला परतीच्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपले. विजेचा कडकडाट व अचानक आलेला मुसळधार परतीच्या पावसामुळे शहरातील सर्व गटारी तुडुंब भरून वाहू लागले. अनेक दुकानांमध्ये व घरांमध्ये गटारांचे पाणी शिरल्याने घाण व मातीचा थर घरांमध्ये व दुकानांमध्ये जमा झाला होता. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील नदीकिनारी असल्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले.
मुंबई गोवा महामार्गासाठी महामार्गावर उंच भराव करून पूल बांधल्याने गावातील नैसर्गिक पाण्याचा निचऱ्याचा मार्ग बंद झाल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरून ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील गडब गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने गावातील अनेक ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या परिस्थितीची पाहणी करण्याकरिता पेण तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी गडब येथे भेट दिली.
मुसळधार पावसामुळे पेण मधील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. शहरातील पेण एसटी स्टँन्ड, पेण नाका, विक्रम स्टँन्ड, बाजारपेठ ,शंकर नगर, हुडको मैदान आदि ठिकाणी पाणी साचले होते. तर भुंडापुलावरुन पाणी वाहत होते. तसेच मुसळधार पडणा-या परतीच्या पावसामुळे हेटवणे धरण, बाळगंगा धरण यासह भोगावती नदी धुतडी भरुन वाहत होत्या. तालुक्यातील भाल, दादर, रावे, वढाव,अंतोरे,गडब, या गावांच्या जवळ असलेल्या खाडींच्या पाण्याची पातळी वाढल्याने शेतजमिन पाण्याखाली येऊन शेतीचे नुकसान झाले आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसाने ग्रामीण व शहरी भागांतील विज पुरवठा खंडित झाला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. पावसामुळे नागरीक हैराण झाले आहेत.