सरसकट नुकसान भरपाईची मागणी
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. मात्र, सद्यस्थितीत नैसर्गिक आपत्ती, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अतिवृष्टीने शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. या परिस्थितीने शेतकरी हवालदिल झाला असून अतिवृष्टीने शेतकऱ्यांना रडवले आहे. त्यामुळे सरकारने सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शिहू बेणसे विभागातील शेतात पाणीच पाणी झाले असून भाताचे रोप पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. खाडीलगत असलेली शेती अक्षरशः पाण्याखाली आली गेली आहे. गुडघाभर चिखलात जाऊन शेतकरी पीक सावरण्यासाठी धडपडत आहेत; मात्र, त्याची अवस्था केविलवाणी झाली आहे. काही भागांत कापणीला आलेली भातपिकं चिखलात रुतून त्याला कोंब आले असून पीकांची कुजण्याची प्रक्रिया देखील सुरू झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. एकीकडे उत्पादन घटल्याने कुटुंबाला वर्षभर लागणारा भात उपलब्ध होणार नाही, तर दुसरीकडे बाजारातून महागडे भात धान्य विकत घ्यावे लागेल. महागाईच्या काळात हा खर्च शेतकऱ्यांच्या परवडणाऱ्या पलीकडे जाणारा आहे. त्यामुळे आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, शेतकऱ्यांनी जगावे की मरावे, असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला भेडसावत आहे. त्यामुळे सरकारने सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
