खरिपाच्या पिकावर कुटुंबाचा उदरनिर्वाह
| चिरनेर | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस कोसळला. त्यामुळे कापणीला आलेले उभे पीक शेतात जमीनदोस्त झाले आहे. दिवाळीचा सण तोंडावर आला असताना, शेतकरी मात्र उरले सुरलेले पीक गोळा करण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा दिवाळीचा सण संकटातच जाणार आहे. सरकारी यंत्रणेने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. मात्र, या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरात खरिपाचे धान्य आलेले नाही. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना यावेळी धनत्रयोदशीला नवीन दाण्याची पूजा करता येणार नाही. याची शेतकऱ्यांना खंत वाटते.
त्याचबरोबर या महिन्यात अजून पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हातातोंडासी आलेले भरघोस भाताचे पीक वाया जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या भागात काही प्रमाणात पाळीव गुरे ही आहेत. त्यांच्या खाद्याचा विचार करता पेंढा हा महत्त्वाचा आहे. परंतु, परतीच्या पावसाच्या भीतीमुळे कापणीनंतर भाताची कडवी दोन-तीन दिवस शेतात वाळत न ठेवता, भाताची ताबडतोब झोडणी केली जात आहे. त्यामुळे गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्न बिकट बनला आहे.
उरण तालुक्यात वर्षभरात खरिपाचे एकमेव पीक घेतले जाते. या पिकाच्या उत्पन्नावर येथील शेतकऱ्यांना वर्षभर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. सद्यस्थितीत नैसर्गिक आपत्ती, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अतिवृष्टीने शेतकरी अक्षरश: उध्वस्त झाला आहे. परतीच्या पावसात शेतकऱ्यांचे सोन्यासारखे भातपीक मातीमोल झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला असून, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना रडविले आहे. त्यामुळे भात पिकांचे सरसकट पंचनामे करून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. उरण तालुक्यातील मोठीजुई, कळंबुसरे, चिरनेर, वशेणी, विंधणे, दिघोडे, वेश्वी, खोपटे, सारडे, धाकटीजुई, केगाव, नागाव या भागातील अनेक गावातील भातखाचरात पाणीच पाणी झाले असून, भाताची पिके आडवी होऊन पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. यात खाडी विभागातील शेती अक्षरशः पाण्याखाली आली आहे. भात शेतीत गुडघाभर चिखल असून, अशा चिखलात जाऊन शेतकरी भातपिके वाचविण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर या भागात कापणीला आलेली भातपिके चिखलात सापडली आहेत. त्याला कोंब देखील आले आहेत. त्यामुळे भातपिके कुजून जाण्याची शक्यता असल्याची माहिती, येथील शेतकरी गोपाळ केणी यांनी दिली. दरम्यान शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.





