दीपावलीत छोट्या शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी
। सारळ । वार्ताहर ।
गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाने खारीपाटातील बर्याच शेतकर्यांना मात्र कपाळाला हात लावण्यास भाग पाडले आहे. अनेक संकटांना तोंड देऊनही शेतात भाताची कणस लोंब्यानी भरलेलेली पाहून स्थानिक शेतकरी समाधान व्यक्त करीत होता, परंतु यावेळी अचानक पडलेल्या पावसाने कापलेली शेती मातीमोल केली आहे. या धुवाँधार पावसात कापलेली भाताची रोपे जमिनीवर लोळून मातीमोल झाली आहेत. यामुळे शेतकर्यांचे दुःख दाटून आले आहे. मरमर मेहनत करून भातपिक लावून त्याची काळजी घेऊनही शेवटी पावसाने भातपिकांची केलेली माती पाहून निसर्गाच्या मनात नक्की आहे तरी काय अशा प्रश्न अश्रू भरल्या नयनांनी येथील शेतकरी विचारत आहेत. यावेळी छोट्या प्रमाणात शेती करणार्यांचे यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भात कापून दोन-तीन उन्हात सुकवून नंतर त्याची बांधणी किंवा झोडणी करण्याची पद्धत असल्याने या अचानक आलेल्या पावसामुळे कापलेली रोपे सुरक्षित कशी ठेवावी याचे तंत्रज्ञान अजून शेती शेत्रात आलेले नाही. यामुळेच शेतकर्यांचे नुकसान होत असल्याची भावना शेतकरी याबाबत व्यक्त करीत आहेत.