जुना अंबा नदी पूल कमकुवत
| सुधागड-पाली | वार्ताहर |
वाकण-पाली-खोपोली मार्गावरील जुना अंबा नदी पूल 1950 साली बांधण्यात आला असून, त्याला सुमारे 73 वर्षे झाली आहेत. तेव्हाच्या वाहन संख्येच्या तुलनेत आत्ताच्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे एखादे अवजड वाहन या पुलावरून जात असताना धोका वाढतो. हा पूल कमकुवत झाला असतानाही अवजड वाहनांची राजरोसपणे वाहतूक होत आहे. त्यामुळे पुलाना धोका निर्माण झाला आहे.
भविष्यात महाड येथील सावित्री नदी व काशिदसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याआगोदर या मार्गावरून संबंधित अधिकार्यांना ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यात जिल्हाधिकार्यांनी आदेशही देण्यात आले होते. या पुलाचे काम संरचनात्मक लेखापरीक्षण होणे गरजेचे आहे. या मार्गावर दुपारी तसेच रात्रीच्या वेळेस अवजड वाहने धावत आहेत. या गंभीर बाबीकडे उपप्रादेशिक परिवहन विभाग दुर्लक्ष करत असल्याने पाली-खोपोली मार्गावर कोळसा, खडी, ग्रिट लोखंडी कोईल, लोखंडी पाइप यांची बेकायदेशीर ओव्हरलोड वाहतूक होत आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. पाली-खोपोली महामार्गावर अवजड वाहतुकीमुळे अपघात वाढले आहेत. त्यामुळे हा महामार्ग प्रवाशांसाठी असुरक्षित झाला आहे. या मार्गावरील अवजड वाहतुकीवर थांबणे गरजेचे आहे. या सर्व प्रकाराकडे संबंधित खात्याकडून मात्र कानाडोळा होत असल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे.