अवजड वाहतूक ठरतेय प्रवाशांसाठी धोकादायक

। पाताळगंगा । वार्ताहर ।
सावरोली -खारपाडा या रस्त्याचे काम उत्तम प्रकारे झाल्यामुळे प्रवासी वर्ग समाधान व्यक्त करीत आहे. मात्र या मार्गावरुन होत असलेली अवजड वाहतूक प्रवाशांसाठी धोकादायक ठरु लागली आहे. या परिसरात शेकडो कारखाने निर्माण झालेले आहेत.तर या कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल वाहनामध्ये वाजवीपेक्षा मोठ्या प्रमाणात भरला जात आहे. शिवाय जे वाहन चालक वेगाने वाहन चालवित असल्यामुळे अपघाताची समस्या निर्माण झालेली आहे. यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अनेक वेळा या मार्गावर माल भरलेली वाहने अपघातग्रस्त झाल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरुन पाठविणे एवढेच काम येथील कारखानदार करताना दिसत आहेत. परिणामी या मार्गावर अनेकवेळा अपघात काही जीवघेणी ठरत असून काही किरकोळ स्वरुपात तर काहींना अपगंत्व येण्याची वेळ निर्माण झाली आहे. या रस्त्यावर वाहनचालकांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या मार्गावर अनेक गावे शाळा,महाविद्यालये आहेत. मात्र यांचा विचार कोणीच करीत नाही उलट आपल्याला नियोजित वेळेवर कसे पोहचता येईल याचाच विचार प्रत्येक चालक करीत आहे.यामुळे आपल्याला अपघाताला निमंत्रण मिळत आहे. गेले अनेक वर्षे या मार्गावर अवजड वाहतूक आहे.पोलिसांकडून अनेकदा कारवाईही पण करण्यात आलेली आहे. तरीही परिस्थिती जैसे थे असल्याने या वाहनचालकांना सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाची काळजी नसल्याचे अधोरेखित होत आहे. यावर कायमस्वरुपी मार्ग निघण्याची गरज आहे.

Exit mobile version