सिडको, सांबा खात्याची बनवाबनवी

जीर्ण झालेल्या पुलावरून अवजड वाहनांची वर्दळ, पूल कोसळला तर जबाबदार कोण? मनसेचा सवाल
। जेएनपीटी । वार्ताहर ।
उरण-पनवेल रस्त्यावरील सा. क्र 4/00 वरील पूल कमकुवत झाला आहे. त्यामुळे सदर पुलावरून अवजड वाहनांनी मार्गक्रमण करु नये, असा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सिडकोकडून एक महिन्यापूर्वी सादर करण्यात आला आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सिडकोच्या ढिसाळ कारभारामुळे आजही पावसाळ्यात सदर पुलावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते.

त्यामुळे रात्री-अपरात्री धोकादायक पूल कोसळला आणि जीवितहानी झाली तर सदर अपघाताला जबाबदार कोण, असा सवाल मनसेचे उरण तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी केला आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सी.बी. बांगड यांनी जीर्ण पुलासंदर्भात सिडकोकडे पत्रव्यवहार केला आहे असे नमूद केले. तर, सिडकोकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारचे पत्र सादर न केल्याचे सिडकोचे उपअभियंता भगवान साळवे यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व सिडको यांच्या अशी ही बनवाबनवी या वृत्तीमुळे नाहक जीर्ण झालेल्या पुलाच्या दुर्घटनेत निष्पाप प्रवासी नागरिकांचा जीव गेला तर त्यास जबाबदार कोण, असा सवाल मनसेच्या पदाधिकार्‍यांकडून विचारला जात आहे. या पुलाच्या दुर्घटनेत निष्पाप प्रवासी नागरिकांचा जिव गेला तर सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्यावर मनसेकडून मन्युषवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा मनसेचे उपतालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी संबंधित खात्याला दिला आहे.

Exit mobile version