। नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 8 ऑक्टोबरला होणार आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई वाहतुक पोलिसांनी अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केली आहे. हे वाहतुक बदल उद्या सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत लागू असतील.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. पनवेल जवळील उलवे भागात हे विमानतळ असल्याने ठाणे, पालघर, रायगड, मुंबई आणि उपनगरमधील रहिवाशांना हे विमानतळ गाठण्यासाठी काही महत्त्वाचे रस्ते मार्ग उपलब्ध आहेत. वाहतुक कोंडी तसेच विविध कारणांमुळे सध्याचा प्रवास त्रासदायक ठरु शकतो. परंतु, भविष्यात बुलेट ट्रेन, मेट्रो आणि जल मार्गिकाही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विमानतळ गाठणे शक्य होणार आहे.
नवी मुंबई येथून हजारो अवजड वाहने दररोज वाहतुक करत असतात. 8 ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अति महत्त्वाच्या व्यक्ती तसेच मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. या कालावधीत पोलिसांचा मोठ्याप्रमाणात बंदोबस्त लागू करण्यात आला आहे. बंदोबस्त, सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाहनतुकीच्या नियोजनामुळे नवी मुंबई वाहतुक पोलिसांनी शहरातील सर्व मार्गावरून मार्गस्थ होणाऱ्या, प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केली आहे. हे वाहतुक बदल 8 ऑक्टोबरला सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत लागू असतील. जीवनावश्यक वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, प्रवासी वाहने इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे बदल लागू नसतील.







