| ठाणे | प्रतिनिधी |
ठाणे ते घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे 8 ते 11 ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधीत घोडबंदर मार्गावर मोठ्या वाहनांना बंदी केली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.
ठाणे ते घोडबंदर मार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. खड्डे पडल्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत आणखी भर पडली आहे. यामुळे महामार्ग क्रमांक 84 या रस्त्यावरील गायमुख घाटातील ठाणे ते घोडबंदर या मार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं आहे. 8 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजतापासून ते 11 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजेदरम्यान दुरुस्तीचे काम होणार आहे. यादरम्यान वाहनांची कोंडी होऊ नये, यासाठी या मार्गावर मोठ्या वाहनांना प्रवेश बंद केला आहे.
मुंबई, ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना, माजिवडा येथील वाय जंक्शन, कापूरबावडी जंक्शन, मुंब्रा-कळवा येथून येणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोल नाका, नाशिक येथून येणाऱ्या वाहनांना माणकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व मोठी वाहने अंजूरफाटामार्गे जात आहेत. तसेच, गुजरातकडून येणाऱ्या अवजड वाहनांना चिंचोटी नाका, मुंबई-वसई-विरार येथून येणाऱ्या अवजड वाहनांना फाऊंटन हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या सर्व वाहनांनी चिंचोटी नाकामार्गे इच्छितस्थळी जाण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.







