अवजड वाहनांमुळे अपघातांना आमंत्रण

| रसायनी | प्रतिनिधी |

मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या मोहोपाडा शहरात वाढत असलेली वसाहत, महाविद्यालय, कार्यालये तसेच कारखानदारी यामुळे परिसरात घरोघरी दुचाकी व चारचाकी वाहनांमध्येही वाढ झाली आहे. बाजारपेठेचा केंद्रबिंदू असलेल्या मोहोपाडा शहरात सायंकाळी नेहमीच वाहतूक कोंडी होते. शिवाय दांड-रसायनी रस्त्यावरुन अवजड वाहनांची रहदारी वाढल्याने अपघाताच्या समस्या वाढत आहेत. यावेळी रसायनी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. मोहोपाड्यातील वाहतूक कोंडीवर पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ यांनी मार्ग काढण्याची गरज असल्याचे येथील नागरिकांनी कृषीवलच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

मोहोपाडा बाजारात आसपासच्या परिसरातील नागरिक बाजारहाट करण्यासाठी आले की वाहन कोठे उभे करावे, हा प्रश्न निर्माण होतो. वाहनचालक मध्येच गाडी उभी करून खरेदी अथवा इतर कामासाठी बाजारात जातात. अशावेळी एखादे वाहन आले तर त्या थांबलेल्या वाहनामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिक व प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. मोहोपाडा पंचशिलनगरजवळ मैदानाच्या बाजूला वाहनतळ आहे. तरीही वाहनचालक त्याचा वापर न करता वाहन रस्त्याकडेला उभे करून वाहतूककोंडी करत आहेत. वाहनचालक, ग्राहक व नागरिकांना होणारा त्रास प्रशासनाने लक्षात घेऊन मोहोपाडा शहरात सुसज्ज वाहन वाहनतळ तयार करून वाहनचालकांचे लक्ष वेधणारे सूचना फलक लावावेत. शिवाय दांड-रसायनी रस्त्यावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीला नो एन्ट्री किंवा वेळ राखून ठेवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version