हेदवली सावळे रस्त्याची दुरवस्था

ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील सावळे हेदवली या रस्त्याचे बांधकाम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आले होते. या योजनेच्या माध्यमातून बनलेल्या रस्त्यावर अवघ्या सहा महिन्यात खड्डे पडले असून, वाहने चालवणे कठीण बनले आहे. दरम्यान, या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी ग्रामस्थांनी बांधकाम खात्याला कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.

खराब रस्त्यामुळे सावळे आणि हेदवली गावातील ग्रामस्थांना दररोज खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. या प्रवासादरम्यान खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक अपघात घडत आहेत. त्यामुळे आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गरोदर महिला आणि आजारी यांना घेऊन जाणारी वाहने ही देखील अशा खड्ड्याने धोका पत्करून प्रवास करीत आहेत. हेदवली गावालगत असलेल्या रस्त्यालगत असलेली दरी आणखी धोकादायक बनली आहे.

या रस्त्याचे अनेक वर्षापासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू आहेत. मात्र, रस्त्याचे काम अनेक वर्षे सुरूच असून गेल्या सहा महिन्यानंतर केलेले डांबरीकरण उधळले. त्याकडे ग्रामीण विकास यंत्रणेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पेण येथे असलेल्या संबंधित कार्यालयाचा एकही शाखा अभियंता कर्जत तालुक्यात नसतो त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्यावर जाब कोणाकडे मागायचा असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे खराब झालेल्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे. रस्ता पुन्हा सुस्थितीत न आणल्यास कर्जत- मुरबाड रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला. रस्त्याबाबत स्थानिक ग्रामस्थ दगडू जोशी, हरिचंद्र म्हसकर, रोहिदास जोशी, सोमनाथ जोशी, नितीन भोर्डे, निलेश बोडके, मिलिंद बोडके, यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Exit mobile version