स्थानिकांसह वाहनचालकांमध्ये तीव्र संताप
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील चिंचवली-चांधईमार्गे कडाव गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम खात्याने भरले, मात्र खड्डे भरण्याचा केवळ देखावा होता काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे तसेच तेवढ्यात आले असून खड्डे भरण्याची कार्यवाही दिखाऊपणा म्हणून केली काय? असा सवाल वाहनचालक यांनी उपस्थित केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अखत्यारीत असलेल्या चिंचवली-उकरूळ-कडाव-तांबस-जांभिवली-वेणगाव-दहिवली-कोंडिवडे या राज्यमार्ग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. हा रस्ता मुळातच अत्यंत अरुंद असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालवताना चालकांची मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील वाहतूक लक्षात घेऊन बांधकाम खात्याने खड्डे भरण्याची कार्यवाही केली. मात्र या रस्त्यावर पडलेले बहुतेक खड्डे हे तसेच ठेवण्यात आले असून मोठे खड्डे भरून लहान खड्ड्यांकडे बांधकाम खात्याने दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम वाहनचालकांना अजूनही खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे.
रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम घेणाऱ्या ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम करत केवळ खड्डे भरण्याचा दिखाऊपणा केला आहे. रस्त्यावरील लहान खड्डा भरत असताना त्याच्या अगदी शेजारी असलेला दुसरे खड्डे तसेच ठेवले आहेत.
या फसव्या कामामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी करावी, अशी मागणी या रस्त्याने प्रवास करणारे वाहनचालक करीत आहेत. जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्या आणि प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या संबंधित ठेकेदारावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.







