। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
पुण्यात हेल्मेट सक्ती न करता त्याच्या वापराबाबत प्रबोधन केले जात आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरी शहरात संबंधित अधिकार्यांनी कार्यवाही करावी, अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेऊन केली आहे. 4 एप्रिलपर्यंत जिल्हाधिकार्यांनी या संदर्भात पत्रक जारी करावे. मात्र तसे झाले नाही तर नागरिकांनी हेल्मेट वापरू नये. वेळ पडल्यास आपण नागरिकांच्या बाजूने उभे राहू, असाही इशारा सामंत यांनी दिला.
रत्नागिरी शहरात होणार्या हेल्मेट सक्तीबाबत विरोध वाढत चालला आहे. तशा तक्रारी मंत्री सामंत यांच्याकडे गेल्या होत्या. त्याला अन्य पक्षाचाही पाठिंबा मिळाल्याने हेल्मेट सक्ती शिथिल करण्याबाबत सामंत यांनी वरिष्ठ अधिकार्यांची तातडीची बैठक आयोजित केली होती. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संतोष चव्हाण, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक शिरीष सासणे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुण्याच्या धर्तीवर रत्नागिरी शहरात हेल्मेट वापराबाबत सक्ती करण्यात येऊ नये. हेल्मेटबाबत वाहनधारकांचे प्रबोधन करण्यात यावे; मात्र राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करावी. या संदर्भात जिल्हाधिकार्यांनी परिपत्रक काढून नागरिकांना आवाहन करावे. अधिकारी वर्गाने त्यानुसार अंमलबजावणी करावी. राज्यातील एका जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असा निर्णय घेऊ शकतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या शहरात असा निर्णय होऊ शकतो तर महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात का होऊ शकत नाही, असा सवालही त्यांनी केला.