सणांमध्ये दुष्काळग्रस्तांना मदत करा

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे आवाहन

| रसायनी | वार्ताहर |

आगामी काळात येणारे सण साजरे करताना राज्यात दुष्काळसदृश्य निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन, जमल्यास त्याठिकाणी सढळ हाताने मदत कार्यात सहभागी व्हा आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सण साजरे करा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे. खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत चौक पोलीस दूर क्षेत्र यांनी चौक येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात येणाऱ्या काळात गोकुळाष्टमी, दहिहंडी, गणेशोत्सव साजरे करताना सार्वजनिक गणेश मंडळ, पदाधिकारी, विविध मंडळे, ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी विक्रम कदम बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सर्वप्रथम सार्वजनिक धर्मादाय आयुक्त यांची परवानगी घेणे आवश्यक असून, रस्त्याच्या कडेला असलेले मंडप मजबूत बांधून रुग्णवाहिका व अन्य वाहणे वाहतूक कोंडी न होईल अशा प्रकारे असावेत.

मंडपास विद्युत पुरवठा अधिकृत घ्यावा, 24 तास स्वयंसेवक असणे अतिशय महत्वाचे आहे. मद्यपान आणि टाईमपास म्हणून पत्ते खेळू नयेत, महिलांसाठी वेगळी दर्शन लाईन याबरोबर त्यांच्यासाठी स्पर्धा आयोजित कराव्यात. कुठल्याही जाती धर्मात तेढ निर्माण होणार नाही, असा देखावा करावा, तेढ निर्माण होईल अशी गाणी लावू नये. करताना सामाजिक,पर्यावरण, स्वच्छता अभियान असे संदेश द्यावेत. डिजे चा आवाज मर्यादेत ठेवा. विधायक कार्यक्रम करुन रक्तदान शिबिर व लहान मुलांच्या स्पर्धा आयोजित करण्यात याव्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांनीही मार्गदर्शन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य चौधरी यांनी केले. बैठकीस यासीन भालदार, जगदीश हातमोडे, गणेश कदम, सचिन मते, निखिल मालुसरे, सुभाष पवार यांच्यासह सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, कार्यकर्ते व चौक पोलीस उपस्थित होते.

Exit mobile version