सव्वाशे कोटींचे हेरॉईन जप्त

। उरण । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील न्हावा शेवा बंदरातून तब्बल 125 कोटींच हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. न्हावा शेवा बंदरातील एका कंटेनरमधून 25 किलोहून अधिक हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईदरम्यान एका व्यवसायिकाला अटक करण्यात आली असून 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. यापुर्वी अमंतलीपदार्थ विरोधी पथकाच्या मुंबईमधील तुकडीने सात किलो हेरॉईननसहीत दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. मुंबईमधील डोंगरी भागामध्ये ही कारवाई करण्यात आली असून ताब्यात घेण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये 15 कोटी रुपये इतकी आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्याप्रकरणी केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने कार्यक्रम आयोजन करणार्‍या कंपनीशी संबंधित चौघांसह आठ जणांना अटक केल्यानंतर एनसीबीचं धाडसत्र सुरु आहे. यामध्ये आधी पवईतून एका व्यक्तीला अटक करण्यात आली. अंकित कुमार असं पवईमध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याच्याकडेही अंमलीपदार्थ आढळून आले आहेत. मंगळवार रात्रीपासून एनसीबीकडून वांद्रे, जुहू आणि गोरेगाव परिसरात ठिकठिकाणी छापे घालण्यात येत आहेत.

Exit mobile version