क्रिकेटपटू हीथ स्ट्रीकचा खुलासा
| हरारे | वृत्तसंस्था |
जन्म आणि मृत्यू कुणालाच चुकलेले नाही.जन्माला येणारा या जगाचा कधीतरी निरोप घेतच असतो.पण एखादी व्यक्ती जिवंत असतानाच त्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी सर्वत्र पसरली तर काय अवस्था होत असेल ना त्या व्यक्तीची.असाच काहीसा गंभीर प्रसंग झिम्बाब्वेचा प्रसिद्ध क्रिकेटपटू हीथ स्ट्रीकच्याबाबतीत घडला.शेवटी त्यालाच आपण जिवंत असल्याचे ट्विट करीत जाहीर करावे लागले आणि साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक याचं कर्करोगाशी लढताना निधन झाल्याचे वृत्त पसरले होते. माजी क्रिकेटपटू आणि हीथ स्ट्रीक यांचे मित्र हेन्री ओलोंगा यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. त्यांच्या ट्वीटनंतर अवघ्या क्रिकेट विश्वात शोककळा पसरली. जगभरातील प्रसिद्धी माध्यमांनी हीथच्या मृत्यूची बातमी दिल्यानंतर आता हीथ स्ट्रीक जिवंत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसह सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे. ओलोंगा यांनी एका चॅटचा स्क्रीनशॉट ट्वीट केला असून त्यात तो जिवंत असल्याचं सांगण्यात आलं आहे. ओलोंगा यांनी आधीचं ट्वीट डिलिट केले आहे.
हीथ स्ट्रीकच्या निधनाचे वृत्त अफवा आहे. मी त्याच्याकडूनच जाणून घेतले आहे. तो जिवंत आहे, असं ट्वीट ओलोंगा याने केलं आहे. यासोबत त्याने हीथसोबतचे चॅट ट्वीट केले आहे.
झिम्बाब्वेच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळख असणाऱ्या स्ट्रीकने 2000 ते 2004 दरम्यान आपल्या देशाचे नेतृत्व केले. त्याच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने 65 कसोटी सामने आणि 189 एकदिवसीय सामने खेळलेत. झिम्बाब्वेच्या क्रिकेटची प्रतिष्ठा देखील काही वेळा त्याने एकट्यानेच राखली. झिम्बाब्वेकडून कसोटी सामन्यांत 100 विकेट घेणारा तो एकमेव क्रिकेटर आहे. स्ट्रीकची गोलंदाजी कौशल्ये ही त्याची संपत्ती होती, पण तो बॅटींगमध्येही कमी नव्हता. हरारे येथे वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने नाबाद 127 धावा केल्या, हे त्याचे एकमेव कसोटी शतक आहे.
स्ट्रीकच्या कारकिर्दीची सुरुवात 1993 मध्ये त्याच्या पाकिस्तानविरुद्धच्या पदार्पणाने झाली. 2005 मध्ये त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीनंतर, स्ट्रीक झिम्बाब्वे, स्कॉटलंड, बांग्लादेश, गुजरात लायन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांना प्रशिक्षण देत होते. भ्रष्टाचारविरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर आयसीसीने आठ वर्षांची बंदी घातली होती. तेव्हा त्याची कारकीर्द धुळीला मिळाली.