| पनवेल | वार्ताहर |
मुंबईच्या परळ भागात राहणार्या एका व्यक्तीने नपुसक असल्याची बाब लपवून ठेवत नवीन पनवेल भागातील एका 27 वर्षीय तरुणीसोबत विवाह करुन तिची आणि तिच्या कटुंबियांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खांदेश्वर पोलिसांनी याप्रकरणी नपुसक पतीसह त्याच्या नातेवाईकांविरोधात फसवणुकीसह छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील तक्रारदार तरुणी नवीन पनवेल भागात आईवडील आणि भावासह राहण्यास आहे. तर, तिच्यासोबत लग्न करणारा तिचा नपुसक पती मुंबईच्या परळ भागात राहण्यास आहे. या तरुणीने 2018 मध्ये लग्नासाठी परेल येथील लग्न जुळविणार्या समाज मंडळाच्या साईटवर आपली नोंदणी केली होती. त्यावेळी नपुसक व्यक्तीने या तरुणीला लग्नासाठी मागणी घातली होती. त्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये नपुसक व्यक्ती एकटाच तरुणीला पाहण्यासाठी पनवेल येथील तिच्या घरी गेला होता. दोघांनी एकमेकांना पसंत केल्यानंतर नपुसक व्यक्तीचा भाऊ, वहिनी, चुलत भाऊ असे सर्वजण तरुणीच्या पनवेल येथील घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये या दोघांचा साखरपुडा आणि विवाह परेल येथील हॉलमध्ये पार पडला होता. यादरम्यान सदर तरुणीने आपल्या नपुसक पतीसोबत शरीरसुखासाठी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या गोष्टीची घाण वाटत असल्याचे सांगून तिचा पती तिच्यापासून दूर जात होता. त्यामुळे या तरुणीने आपल्या पतीला ठाणे येथे औषधोपचारासाठी देखील नेले होते. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्याच्यामध्ये वंध्यत्व असल्याचे सांगितले होते. तसेच त्यासाठी त्याला औषध गोळ्या देखील दिल्या होत्या. मात्र या तरुणीच्या पतीने त्या गोळ्या घेण्यास नकार दिला होता. सदर तरुणी आपल्या पती सोबत फक्त सव्वा महिने राहिली.
त्यानंतर होळीनिमित्त ती आपल्या माहेरी आली असताना, तिने आपला पती नपूसक असल्याची माहिती आपल्या आई-वडिलांना दिली होती. त्यामुळे या तरुणीच्या आई- वडिलांनी तरुणीच्या पतीला आणि त्याच्या नातेवाईकांना संपर्क साधला असता, त्यांनी मुलीला सासरी पाठविल्यास तिला मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर या तरुणीने खांदेश्वर पोलीस ठाणे तसेच महिला आयोगाकडे याबाबत लेखी तक्रार दिली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने खांदेश्वर पोलिसांनी सदर तरुणीच्या पतीसह तिच्या सासरकडील मंडळीविरोधात फसवणुकीसह छळवणुकीचा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.