दिल्लीसह चार राज्यांत हाय अलर्ट

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

26 जानेवारीपूर्वी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; गुप्तचर यंत्रणांचा इशारा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीसह देशातील चार राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन भारतीय गुप्तचर यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे. 26 जानेवारीपूर्वी खलिस्तानी आणि परदेशस्थित दहशतवादी नेटवर्ककडून हल्ल्याचा कट रचला जात असल्याचे गंभीर इशारे मिळाल्याने सुरक्षायंत्रणा पूर्णतः सतर्क करण्यात आल्या आहेत.

इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) शी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, बंदी घातलेल्या खलिस्तानी संघटना तसेच बांगलादेशस्थित दहशतवादी गट दिल्लीसह प्रमुख शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू शकतात. या कटात गुन्हेगारी टोळ्यांची मदत घेतली जात असल्याचेही समोर आले आहे.

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पंजाबमधील काही कुख्यात गँगस्टर परदेशातून कार्यरत खलिस्तानी आणि कट्टरपंथी हँडलर्ससाठी ‌‘फूट सोल्जर‌’ म्हणून काम करत आहेत. भारताची अंतर्गत सुरक्षा कमकुवत करण्यासाठी आणि आपला अजेंडा राबवण्यासाठी हे हँडलर्स गुन्हेगारी नेटवर्कचा वापर करत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

गुप्तचर अहवालानुसार हे गँगस्टर हरियाणा, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सक्रिय असून, त्यांचा खलिस्तानी दहशतवादी संघटनांशी संपर्क दिवसेंदिवस वाढत आहे.

यापूर्वी 10 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणतीही जोखीम न घेण्याच्या दृष्टीने सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

राजधानीत मॉक ड्रिल, सुरक्षा यंत्रणांची कसोटी
26 जानेवारी रोजी कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनापूर्वी दिल्ली पोलिसांच्या नॉर्थ डिस्ट्रिक्टने संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी मॉक ड्रिल घेतली. लाल किल्ला, कश्मीरी गेट, चांदणी चौक तसेच विविध मेट्रो स्थानकांवरही सुरक्षा सराव मोहिमा राबवण्यात आल्या. या मॉक ड्रिलचा उद्देश संभाव्य दहशतवादी हल्ल्यांवर तात्काळ नियंत्रण ठेवण्याची तयारी तपासणे, तसेच सुरक्षायंत्रणा आणि नागरिकांना अधिक सतर्क करणे हा आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून, संशयित हालचालींवर कडक नजर ठेवण्यात येत आहे. नागरिकांनीही सतर्क राहून कोणतीही संशयास्पद बाब तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे

Exit mobile version