महागणपतीच्या दर्शनासाठी भक्तांचा उच्चांक

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील चिरनेर श्री महागणपती क्षेत्रात रविवारी (दि.7) संकष्टी चतुर्थी निमित्ताने कडाक्याच्या थंडीत पहाटेपासूनच भाविकांनी महागणपतीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पहाटे चार वाजल्यापासून गणेश भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. प्रथमता: श्री महागणपतीची महापूजा करण्यात आली. त्यानंतर गणेश भक्तांनी श्रींच्या दर्शनाला सुरुवात केली. काही भाविकांनी पायी वारी करीत गणेश मंदिर गाठून श्रींचे दर्शन घेतले. तसेच, दिवसभर श्री महागणपतीच्या मंदिरात भजनांचा सूर ऐकायला मिळाला. यावेळी संकष्टीला रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे भाविकांच्या गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. तसेच, संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने हार, गावठी भाज्या, वाल व चवळीच्या शेंगा, रानटी कंदमुळे, स्थानिक कुंभारानी बनविलेली मातीची भांडी त्याचबरोबर अन्य पदार्थांच्या विक्रीला ग्राहकांनी पसंती दर्शविल्याचे निदर्शनास आले. चिरनेर परिसरातील अनेक रहिवाशांना दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थी निमित्ताने रोजगार मिळत आहे.

Exit mobile version