पनवेल शहर पोलिसांची कारवाई; पीडित तरुणीची सुटका
| पनवेल | प्रतिनिधी ।
पनवेल शहर पोलिसांनी करंजाडे भागातील एका फ्लॅटवर छापा टाकून त्याठिकाणी सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका 20 वर्षीय तरुणीची सुटका केली असून, वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या 33 वर्षीय महिलेला ताब्यात घेतले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या महिलेने पीडित तरुणीच्या मदतीने सदर फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे तपासात आढळून आले आहे.
पनवेल येथील करंजाडे परिसरातील एका इमारतीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने करंजाडे येथील गणेश पार्क इमारतीमधील संशयित रूम नंबर 103 मध्ये बनावट ग्राहकाला पाठवून खात्री केली. यावेळी सदर फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या आरोपी महिलेने बनावट ग्राहकाकडून वेश्यागमनाचे 3 हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर 20 वर्षीय पीडित तरुणीसोबत वेश्याव्यवसायासाठी पाठवून दिले. यावेळी बनावट ग्राहकाने पोलिसांना इशारा देताच पोलिसांनी सदर फ्लॅटवर छापा टाकला. यावेळी या फ्लॅटमध्ये एक महिला पीडित तरुणीकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीची सुटका केली. तसेच पीडित तरुणीकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
