हाय व्होल्टेज सामना मॉड्युलर स्टेडियमवर

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आयपीएल नंतर आता क्रिकेट चाहते आयसीसी टी-20 विश्वचषकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 2 जून ते 29 जून या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेचे सामने अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर होणार आहेत. जागतिक स्तरावरील क्रिकेटचे आयोजन अमेरिकेत पहिल्यांदाच होत आहे. सामने सुरू होण्याआधीच न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची बरीच चर्चा होत आहे. हे स्टेडियम जगातील पहिले मॉड्युलर क्रिकेट स्टेडियम तर आहेच, पण याच ठिकाणी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही होणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या वर्षी जानेवारीमध्ये न्यूयॉर्कमध्ये 34,000 आसनक्षमतेच्या मॉड्यूलर स्टेडियमचे अनावरण केले होते. येथे भारत-पाकिस्तानसह 20 विश्वचषकातील आठ सामने आयोजित केले जातील. मॉड्यूलर स्टेडियम म्हणजे जे अल्प मुदतीसाठी बांधले जाते. हे स्टेडियम कमी वेळेत बांधून तयार होते. कमी वेळ लागतो कारण ते ॲल्युमिनियम आणि स्टीलपासून बनवले जाते. हे स्टेडियम जोडता येणं आणि काम झालं की मोडून ठेवणं सोप्प आहे. जरी ते टिकाऊ असले तरी ते सामान्य स्टेडियमच्या ठिकाणाप्रमाणेच सुरक्षितता, आराम आणि सुविधा प्रदान करतात. कतार येथे आयोजित फिफा विश्वचषक 2022 साठी स्टेडियम 974 नावाचे मॉड्यूलर स्टेडियम देखील तयार करण्यात आले होते.

Exit mobile version