| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील वाणदे गावचे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते तुकाराम दामोदर पाटील यांचा कबड्डी दिनानिमित्त पुणे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे नुकताच सत्कार करण्यात आला. हा सत्कार राज्य निवड चाचणी स्पर्धे दरम्यान महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे खा. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
तुकाराम पाटील गेली अनेक वर्षे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य असून त्यांनी मुरुड तालुक्यात अनेक मुलं-मुली खेळाडू घडविले असून त्यातील अनेक खेळाडूंची निवड जिल्हा तसेच राज्य पातळीवर करण्यात आली आहे. त्यांनी स्थानिक व जिल्हा पातळीवर अनेक कबड्डी स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने घेऊन त्यांना गौरविण्यात आले.
याप्रसंगी तुकाराम पाटील म्हणाले की आपल्या या वाटचालीत शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, आस्वाद पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, चित्रा पाटील, जे.जे.पाटील आदींचे मोलाचे योगदान लाभले आहे. यावेळी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, अशोक नाक्ती, अमोल पाटील, श्रीकांत वारगे, मनोहर सुर्वे, अमित पाटील, गुलाब वाघमारे, तुकाराम पाटील यांचा परिवार व इतर अनेक हितचिंतक उपस्थित होते.