कलोते ग्रामपंचायतीला महामार्ग पोलिसांची नोटीस

कचरा महामार्गालगत टाकण्यास सक्त मनाई


| खोपोली | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या कलोते ग्रामपंचायत हद्दीतील मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत उघड्यावर कचरा टाकत असल्याने हा कचरा खाण्यासाठी मोकाट गुरांचा वाढलेला वावर अपघाताला निमंत्रण देत आहे. याबाबत महामार्ग पोलीस पळस्पे केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांनी ग्रामपंचायतीला 16 सप्टेंबर रोजी नोटीस बजावली आहे.

कलोते ग्रामपंचायतीची मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या कालव्याला खेटून गावठाण जागा आहे. या जागेत डम्पिंग ग्राऊंड तयार करण्यात आले आहे. ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल, ढाबे, फार्म हाऊस तसेच नागरी वस्तीतील कचरा या ठिकाणी आणून टाकला जातो. कचर्‍याचे कोणत्याही प्रकारचे वर्गीकरण न करता कचरा उघड्यावर टाकण्यात येतो. प्लास्टिक पिशव्या, खराब अन्नपदार्थ, सडलेला भाजीपाला याशिवाय विविध प्रकारचा कचरा जमा होत असल्याने गुरेढोरे, श्‍वान कचरा खाण्यासाठी गर्दी करतात. डम्पिंग ग्राऊंडला कोणत्याही प्रकारचे संरक्षक भिंत नसल्याने गुरांचा, वावर यामुळे 4 सप्टेंबर रोजी एनएमएमटी बसचा अपघात याठिकाणी घडला होता. तीन गुरांना धडक दिल्यानंतर सुदैवाने बस चालकाने बस नियंत्रित केल्याने प्रवाशांचा जीव वाचला होता.

या घटनेनंतर कलोते ग्रामपंचायतीने कचरा विल्हेवाट योग्य रितीने लावण्यासाठी महामार्ग पोलीस पळस्पे यांनी नोटीस बजावली आहे. कचरा विल्हेवाटीसाठी योग्य उपाययोजना करण्याचे सूचना दिल्या आहेत.

तारेची संरक्षण जाळी लावून याठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने उपाययोजना राबविण्यात येणार आहे, तरी ग्रामस्थांनी सहकार्य करत या ठिकाणी कचरा टाकू नये.

– निलेश म्हसकर, ग्रामसेवक, कलोते

Exit mobile version