जनता विद्यालयात घुमला ‘हिंद-दी-चादर’चा जयघोष

| अलिबाग | प्रतिनिधी |

हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्ताने खालापूर तालुक्यातील खोपोली येथील जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकाचवेळी सुप्रसिद्ध गायक सरताज सिंग यांनी गायलेले ‘हिंद-दी-चादर’ हे गीत सादर केले. या ऐतिहासिक उपक्रमाची दखल ‘बेस्ट ऑफ इंडिया’ रेकॉर्डने घेतली असून, अप्पर आयुक्त वैशाली इंदानी यांनी आगामी 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी खारघर येथे होणाऱ्या भव्य सोहळ्यास सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे भावनिक आवाहन केले आहे.

यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाळे, उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, गटशिक्षणाधिकारी दीपा परब, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव किशोर पाटील, विद्यालयाचे प्राचार्य कानिफनाथ गोरे आदि उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेली ही मोहीम आता केवळ ‘व्हिडिओ कंटेंट’ न राहता एक संस्कारांची डिजिटल चळवळ बनली आहे. यावेळी गुरुबचन सिंह यांनी गुरु तेग बहादूर यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकत मुलांचे प्रबोधन केले.

Exit mobile version