सीडब्ल्यूसी प्रशासन, कामगार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची बैठक
। उरण । वार्ताहर ।
भेंडखळ येथिल बंद पडलेले हिंद टर्मिनल हे सिएफएस पुन्हा सुरू करण्यासाठी सीडब्ल्यूसी प्रशासन, कामगार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेमुळे हे सीएफएस लवकरच सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत ही यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
मागील काही महिन्यापासून उरण, भेंडखळ गावाजवळील हिंद टर्मिनलमधिल काम बंद झाले असून, या कंपनीत काम करणारे जवळ जवळ 502 स्थानिक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कंपनी प्रशासनाने देखिल या कंपनीत असलेली आपली साहित्य सामुग्री देखील बाहेर हलवली आहे. उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत 15 वर्षांपूर्वी सीडब्लूसीच्या गोदामात हिंद टर्मिनल या कंपनीने कंटेनर हाताळणीचे काम सुरू केले होते. या गोदामात विविध प्रकारच्या नोकर्यामध्ये येथिल 502 स्थानिक कामगार काम करत होते. तसेच इतर संलग्न कामातदेखील शेकडो कंत्राटी कामगार काम करत होते.
ही कंपनी सुरू करण्यासाठी आणि नविन ठेकेदार नेमण्यासाठी 35 कोटी रूपये देण्याचे पियुष गोयल यांनी सीडब्लसी (हिंद टर्मिनल) चे विभागीय व्यवस्थापक अमित कुमार यांना दिले. तसेच महिनाभरात ही कंपनी सुरू करण्यासाठी टेंडरची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे महिना भरात हे गोदाम सूरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बैठकीला केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल, सीडब्लूसीचे विभागीय व्यवस्थापक अमित कुमार, आमदार महेश बालदी, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा ठाकूर, माजी उपसरपंच, मिलिंद पाटील, कामगार कृती कमिटीचे लंकेश ठाकूर, अभिजित पाटील उपस्थित होते.






