हिंदू मुलींनी जिममध्ये जाऊ नये: आ. गोपीचंद पडळकर

| बीड | प्रतिनिधी |

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे अनेकदा वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतात. विरोधकांवर टीका करताना किंवा हिंदुत्वाचे मुद्दे उपस्थित करताना त्यांनी केलेली विधाने अनेकदा वादात अडकली आहेत. आता नुकतेच त्यांनी बीड जिल्ह्यात केलेल्या विधानानंतर वाद उद्भवला आहे. हिंदू महिला आणि मुलींनी जिममध्ये जाऊ नये, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यातील कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड हे तुरूंगात धर्मांतराचे रॅकेट चालवतात, असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता. त्यानंतर बीड जिल्ह्यात एका सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलत असताना गोपीचंद पडळकर यांनी मुली आणि महिलांना आवाहन केले. ते म्हणाले की, जिममध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा? आपल्या तरूण मुली जिममध्ये जात असतील, तर त्यांना सांगा घरातच योगा करा. तिकडे जाण्याची गरज नाही. ते तुम्हाला फसवत आहेत. तुमच्यावर अन्याय करत आहेत. तसेच ज्या शहरात महाविद्यालये आहेत, त्या महाविद्यालयात विद्यार्थी सोडून दुसऱ्या कोणत्याही पुरूष किंवा मुलास प्रवेश देता कामा नये. महाविद्यालय परिसरात जिहादी प्रवृत्तीची मुले दिसली तर पोलिसांनी त्यांना धडा शिकवला पाहिजे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली.

Exit mobile version