स्वच्छता अभियानात हिरवळ महाविद्यालयाचा सहभाग

। माणगाव । वार्ताहर ।

छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी रायगड किल्ल्यावर साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मुंबई विद्यापीठाचे प्र.कुलगुरू, डॉ. अजय भामरे यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली रायगड स्वच्छता अभियान सुरळीत पार पडले. या स्वच्छता अभियानात महाड हिरवळ महाविद्यालयाने सहभाग घेतला.

सदर स्वच्छता मोहिमेत डॉ.सुनील पाटील, प्रा.सुशिल शिंदे, डॉ.टी.पी.मोकल यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे एनएसएस विद्यार्थ्यांचे नियोजन केले होते. सदर मोहिमेत मुंबई विद्यापीठांतर्गत 20 महाविद्यालयांनी सुमारे 450 विद्यार्थ्यांसह किल्ले रायगडची स्वच्छता मोहीम पार पाडली. हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ सायन्समधील प्राचार्य सुदेश कदम यांच्या प्रोत्साहनाने एनएसएस समन्वयक प्रा. राकेश वडवलकर शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी स्वयंसेवक यांनी मोलाचा सहभाग नोंदवला. स्वच्छता अभियानाच्या शेवटी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या पथकाने छत्रपती शिवराय, माँ साहेब जिजाऊ, तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथा संगीतमयरित्या सादर केल्या. संपूर्ण अभियान यशस्वी केल्याबद्दल प्र.कुलगुरू डॉ.भामरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन, हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष किशोर धारिया यांनी तरुणांमध्ये नागरी जबाबदारीची भावना वाढवण्यासाठी अशा प्रयत्नांच्या महत्त्वावर भर देताना सदर स्वच्छता मोहिमेचे आयोजक, नियोजक आणि विद्यार्थी स्वयंसेवक यांचे कौतुक करून पुढील समाज कार्यास शुभेच्छा दिल्या. समाजाने स्वच्छता राखावी असे आवाहन केले.

Exit mobile version