ऐतिहासिक ऑलिंपिया रेसकोर्स

ब्रिटिशांनी निर्माण केलेले मैदान
। नेरळ । वार्ताहर ।
माथेरानसारख्या डोंगरावर असलेल्या सपाट जागेवर 54 चौरस किलोमीटरमध्ये ब्रिटिशांनी आपल्या अधिकारी वर्गासाठी कवायती आणि घोडेस्वारीकरिता ऑलिंपिया रेसकोर्स नावाचे मैदान विकसित केले आणि आजही तेथे घोड्याच्या शर्यतीसाठी, विविध खेळांसाठी हे मैदान वापरात आहे. त्या ऑलिंपिया रेसकोर्सची कहाणी काहीशी रोचक अशीच आहे.
सन 1891मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारमधील सुपेरिटेडन्ट मिस्टर विलकिन्स यांनी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून खोदकाम सुरू केले. त्या परिसरात पाण्याचे जलाशय तयार करण्यासाठी दोनदा खोदकाम करण्यात आले होते. इतिहासातील नोंदीनुसार त्यात एकदा बोअरवेल खोदण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र, ते ठिकाण समुद्रसपाटीपासून 2380 फुटांवर असल्याने येथे पाण्याचे जलस्तोत्र सापडले नाहीत आणि शेवटी दोन्ही प्रयत्न निष्फळ ठरले, त्यामुळे विलकिंस यांनी पाण्याची व्यवस्था करण्याचा नाद सोडला. मात्र, मुंबई प्रांतातून मोठ्या प्रमाणात ब्रिटिश अधिकारी हे आपला नोकरशाही लावजमा घेऊन माथेरानला यायचे आणि त्याकाळात सनदी अधिकारी यांच्यासाठी मैदानी खेळ आणि घोडेस्वारीसाठी मोठ्या मैदानाची गरज भासू लागली होती. सरतेशेवटी तत्कालिन सुपरिटेनडेंट सर विलकिन्स आणि त्यानंतर आलेले अधीक्षक मेजर बँरी यांनी ब्रिटिश सरकारच्या धर्मादाय दानातून मिळालेले 1000 रुपये इतका खर्च करून पाण्यासाठी खोदलेले खड्डे बुजवून हा भाग सपाटीकरण करून घेतला. त्या ठिकाणी घोड्यांच्या रपेटीसाठी 700 मीटर वर्तुळाकार परीघ असलेले मैदान सन 1892-93 ला पूर्ण केले. हेच ते नावारूपाला आलेले ‘ऑलिंपिया रेसकोर्स’ मैदान.
ऑलिंपिया रेसकोर्स वर हेलिकॉपटर सेवा देखील सुरू झाली होती. राज्याचे शिवसेना – भाजप सरकारमधील मुख्यमंत्री मनोहर जोशी हे हेलिकॉप्टरमधून माथेरानला आले होते.त्यानंतर खासगी कंपनी पवनहंसने माथेरान-मुंबई हेलिकॉप्टर सेवादेखील सुरू केली. मात्र, पर्यावरणप्रेमी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन जेमतेम दोन फेर्‍या मारून ही सेवा थांबली ती कायमची. आता तर 2002 ला माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर केल्यानंतर हेलिकॉप्टर सेवा ही केवळ आठवण बनली आहे.
खेळातून पर्यटन
माथेरानमध्ये पर्यटन वाढावे यासाठी राज्य सरकारने या ऑलिंपिया रेसकोर्स मैदानाचे सुशोभिकरणासाठी क्रीडा संकुल म्हणून करण्याचा निर्णय घेतला आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे अध्यक्ष असलेल्या मुंबई फुटबॉलचे प्रशिक्षण वर्ग या मैदनावर आयोजित केले गेले. त्यावेळी अनेक क्रीडा प्रकार यांच्यासाठी हे मैदान विकसित व्हावे म्हणून राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी साडे पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. आता या मैदानावर अनेक कामे सुरू असून, खेळातून पर्यटन ही संकल्पना माथेरान गिरीस्थान नगरपरिषद राबवत आहे. मागील वर्षभरात जिल्हा आणि राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आणि त्यातून क्रीडापटू माथेरानमध्ये आले. त्यांच्या माध्यमातून पर्यटन हंगाम नसलेल्या दिवशी पर्यटन माथेरानमध्ये दिसू लागले आहेत. खेळातून पर्यटन हा ट्रेंड ऑलिंपिया रेसकोर्समध्ये म्हणजे या मैदानाचे नामांतर झाल्याने ‘हुतात्मा विरभाई कोतवाल’ क्रीडा संकुलात दिसून येत आहे.

Exit mobile version