रणजीत उपांत्यफेरी सामन्यात खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी

| मुंबई | वृत्तसंस्था |

सध्या भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामना थरार सुरू आहे. यामध्ये मुंबई आणि बडोदा संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात मुंबईच्या खेळाडूंकडून ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली.

मुंबईचे अष्टपैलू तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे यांनी बडोद्याविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत इतिहास रचला. दहाव्या आणि अकराव्या क्रमांकावर खेळताना दोघांनी एकाच डावात शतके झळकावली आणि या क्रमांकावर फलंदाजी करणारे दोन्ही फलंदाज एकाच डावात शतके ठोकणारी प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील दुसरी जोडी ठरली.

1946 नंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दहाव्या आणि अकराव्या क्रमांकावर असलेल्या फलंदाजांनी एकाच डावात शतके ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यावेळी चंदू सरवटे आणि शुटे बॅनर्जी यांनी इंग्लंड दौर्‍यात टूर मॅचमध्ये ही कामगिरी केली होती. या दोन्ही खेळाडूंनी सरे काउंटी क्रिकेट क्लबविरुद्ध ही कामगिरी केली होती. या डावात दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणार्‍या तनुष कोटियनने 129 चेंडूत नाबाद 120 धावा केल्या. यादरम्यान त्याने 10 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याचवेळी अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तुषार देशपांडेने 129 चेंडूत 123 धावा केल्या. यादरम्यान, तुषार देशपांडेने 10 चौकार आणि 8 षटकार मारले. या दोन खेळाडूंच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबई संघाने या डावात 569 धावा केल्या असून सामना जिंकण्यासाठी बडोद्याला 606 धावांचे लक्ष्य दिले आहे.

या सामन्याच्या पहिल्या डावात मुशीर खानने मुंबईसाठी द्विशतक झळकावले होते. मुशीर खानने 357 चेंडूत 203 धावा करत संघाची धावसंख्या 384 पर्यंत नेली. प्रत्युत्तरात बडोदा संघाला पहिल्या डावात केवळ 348 धावा करता आल्या. अशा परिस्थितीत हा सामना अनिर्णित राहिला तर मुंबई संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्‍चित करेल.

Exit mobile version