इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमींनी पर्यटनस्थळांकड़े फिरवली पाठ
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तू, देवालये, तब्बल 240 किमीचा सुंदर व रमणीय समुद्रकीनारा आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या रायगड जिल्ह्यात सध्या पर्यटकांची रेलचेल आहे. परंतु रायगड, मुरुड-जंजिरा किल्ला, अलिबाग, हरिहरेश्वर, दिवेआगर, मुरुड-काशीद असे समुद्र किनारे, महड व पालीचा गणपती अशी काही ठराविक ऐतिहासिक धार्मिक व पर्यटन स्थळे सोडल्यास जिल्ह्यातील इतर दुर्लक्षित पण महत्वाच्या पर्यटन स्थळांकडे पर्यटक पाठ फिरवितांना दिसत आहेत.
येथे शिवरायांच्या काळातील अनेक गड-किल्ले आहेत. ज्याचा विसर इतिहास व दुर्गप्रेमींना झाला आहे. त्यामध्ये अलिबाग जवळील भव्य जलदुर्ग खांदेरी-उंदेरी, चौलचा किल्ला, मुरुड जवळील कोर्लई किल्ला, रायगडावर निजामपुर मार्गे जातांना लागणारे माणगाव तालुक्यातील माणगड व कुर्डूगड (विश्रामगड) पालीजवळ असलेले मृगगड, सरसगड तसेच सुधागड हे भव्य किल्ले. शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेली उंबरखिंड, तळा तालुक्यातील तळगड किल्ला त्याच्या समोरच दिसणारा घोसाळगड किल्ला. पाचाड येथे असलेली जिजाबाईंची समाधी या सर्व ऐतिहासिक महत्व असलेल्या वास्तू उपेक्षित आहेत.
खालापूर तालुक्यातील पाली-खोपोली मार्गावर शेमडी गावापासुन अवघ्या चार किमी वर असलेली उंबरखिंड जेथे शिवरायांनी अवघ्या एक हजार सैनाला घेवुन तब्बल 20 हजार सैन्यासह स्वराज्यावर चाल करुन आलेल्या कारतलबखान चा पाडाव केला होता. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विजयस्तंभ तेथे उभारण्यात आला आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले हे ठिकाण खुपच आकर्षक आहे. पुण्या-मुंबईच्या पर्यटकांना येथे सहज येता येऊ शकते. परंतू येथे ठराविकच लोक भेट देतात. नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्मगाव पोलादपूर तालुक्यातील उमरठ हे गाव. तेथे तानाजी व मराठ्यांचा शूर सरदार शेलार मामांची समाधी आहे. तसेच तानाजींचा भव्य पुतळा देखिल आहे. परंतू ते पाहण्यासाठी फारसे लोक तेथे फिरकत नाहीत. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे जन्मस्थळ असलेल्या श्रीवर्धन तालुक्यात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी त्यांच्या घरातील चौथर्यावर पेशवे स्मारक/मंदिर उभारण्यात आले आहे. परंतु तेथेही कोणी फारसे जात नाही. अशी अनेक स्मारके दुर्लक्षित आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील श्री रूपनारायण मंदिर, सिद्धिविनायकाचे प्राचिन मंदिर, काळभैरव, सोमजाई, कुसमादेवी ही जागृत मंदिरे. माणगाव मुगवली स्वयंभू गणेश मंदिर, अलिबाग तालुक्यातील कणकेश्वर येथील शिवमंदिर आदी अनेक तालुक्यांतील प्राचीन मंदिरे व धर्मस्थळे उपेक्षित आहेत.
प्राचीन लेणी दुर्लक्षित
महाडकडे जातांना महामार्गाच्या कडेलाच गांधारपाले गावाजवळ डोंगरात कोरलेल्या 29 भव्य बौद्ध लेण्या आहेत. रायडावर जाणारे पर्यटक फक्त रस्त्यावरुनच या लेण्या पाहतात व पुढे मार्गस्थ होतात. तसेच माणगाव तालुक्यातीत मांदाड खाडी मुखाजवळ डोंगरात कोरलेल्या वीस बौद्ध लेणी आहेत. तळा येथील कुडा लेणी, सुधागड तालुक्यातील नेणवली येथील एकविस लेणी, ठाणाळे जवळ प्राचीन लेणी समूह, तर गोमाशी गावजवळ प्राचीन भृगू ऋषींचे (बौद्ध) लेणे आहे. अशा अनेक प्राचीन लेण्यांची दुरवस्था झाली आहे.
ऐतिहासिक वारसे उपेक्षित
पनवेल कर्नाळा रस्त्यावर असलेले शिरढोण हे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव तेथे त्यांचा वाडा आहे. तेथे त्यांच्या व कुटूंबाच्या वस्तु जतन करण्यात आल्या आहेत. कर्नाळा किल्ल्यावर अनेक लोक जातात परंतू क्रांतिविरांच्या वाड्यावर फारसे कोणी जात नाही.
भुदान चळवळीचे प्रणेते व पहिले वैयक्तिक सत्याग्रही असलेले विनोबा भावे यांचे पेण तालुक्यातील गागोदे हे जन्मगाव तेथे त्यांचा वाडा आहे. क्वचित शाळेतील मुलांच्या ठराविक सहलींशिवाय येथे कोणीही जात नाही. तसेच महाड तालुक्यात नाते गावात देशाचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचे घर दुर्लक्षित आहे. तसेच माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री बॅ.ए. आर अंतूले यांचे आंबेत गाव, रोह्यातील स्वाध्याय परिवाराचे अध्वर्यू पांडूरंगशास्त्री आठवले यांचे जन्मगाव पाहण्यासारखे आहे.
शिवथर घळीकडे दुर्लक्ष
महाड पोलादपुर रस्त्यावरुन शिवथरघळी कडे जाणारा फाटा आहे. महाडवरुन येथे जाण्यास बससेवा उपलब्ध आहे. शांत, निरव व रमणीय या घळीत समर्थांनी दहा वर्षे वास्तव केले होते. यथेच त्यांनी दासबोधाची निर्मीती केली. या मठास सुंदरमठ म्हणतात. धुळ्याचे श्री शंकर श्रीकृष्ण देव यांनी 1930 मध्ये या घळीचा शोध लावला. डोंगरदर्यांत व दुर्गम भागात असल्याने या ठिकाणी फारसे कोणी येत नाही.