किल्ले भिवगडाच्या शोधमोहिमेत सापडला ऐतिहासिक ठेवा

| नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील गौरकामथ ग्रामपंचायतीमधील गौरकामथ गावाच्या परिसरात असलेल्या किल्ले भिवगडसंबंधी अभ्यास काही अभ्यासक करीत होते. किल्ले भिवगड परिसरात मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक ठेवी आढळून येण्याची शक्यता लक्षात घेऊन गौरकामथ ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. किल्ल्याच्या संवर्धनासाठी गौरकामथ ग्रामपंचायतीतर्फे इतिहास अभ्यासक सागर सुर्वे आणि ओंकार महाडिक यांची अधिकृत नेमणूक करण्यात आली आहे. सुरू केलेल्या संशोधनात किल्ले भिवगडच्या इतिहासात भर घालणारी वास्तू शोधण्यात संशोधकांना यश येताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी गडफेरी करीत असताना अभ्यासकांना ऐतिहासिक अवशेष आढळले. त्यांनी तात्काळ ही बाब ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगेश देशमुख यांच्या कानावर घातली आणि त्यांनी 9 मार्च रोजी शोधमोहीम सुरु केली आहे. सागर सुर्वे, ओंकार महाडिक आणि अनिकेत मगर हे तिघे इतिहास संबंधित परिषदेमध्ये संशोधन पेपर सादर करणार आहेत. या संबंधित पुरावे आणि अवशेषामुळे भिवगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होत असून इतिहास अभ्यासकांचा गडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. ड्रोनमधून संबंधित वास्तू पाहण्यासाठी मितेश डागा सामील झाले. तेथील वनस्पतींच्या नोंदींसाठी वनस्पतीशास्त्रज्ञ नम्रता गांगल आल्या होत्या. त्यासंबंधित वास्तूपर्यंत जाण्यासाठी गिर्यारोहणाच्या साहित्यासह अनिकेत मगर यांनी जबाबदारी घेतली. या संशोधन पथकाला भिवगडला ही ऐतिहासिक मोहीम राबवण्यात यश आले. संबंधित वास्तू गडाइतकीच जुनी असून सततच्या होणार्‍या भूस्खलनामुळे मातीने भरून गेली आहे. उपसरपंच योगेश देशमुख लवकरच सागर सुर्वे आणि ओंकार महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धन मोहीम घेणार आहेत. किल्ले भिवगडबाबत अधिकचे संशोधन करून भिवगडावर गौरमाता प्रतिष्ठान आणि अन्य संस्थांतर्फे घेण्यात येणार्‍या मोहिमांमुळे गड स्वच्छ होत असून वृक्षारोपणामुळे सुशोभित होत आहे.

Exit mobile version