बौद्ध समाजाचे ऐतिहासिक गावठाण

आजही महार गावठाण नावाने शासन दरबारी नोंद
। वावोशी । वार्ताहर ।
ऐतिहासिक पाऊलखुणांच्या माध्यमातून इतिहास चिरकाल जिवंत राहतो, याची प्रचिती आजही विविध ग्रामपरिसरात याची देही, याची डोळा पाहता येते, अनुभवता येते. अशाच ऐतिहासिक पाऊलखुणा खालापूर तालुक्यातील दहागाव छत्तिशी विभागातील शिरवली ग्रामपंचायत हद्दीत दिसत आहेत.

महार गावठाणचे जुने अवशेष पाहता हे गावठाण स्वातंत्र्यपूर्व काळातील असून ते पूर्वीचे महार समाज आणि आताचे वावोशी येथे स्थलांतर करून स्थित झालेल्या बौद्ध समाजाचे आहे. विशेष म्हणजे या गावठाणाची नोंद खालापूरच्या सरकारी दप्तरी कार्यालयात आजही पाहायला मिळते. शिरवली ग्रामपंचायत हद्दीत महार गावठाण या नावाने ओळखले जात असलेल्या ठिकाणी आताचे बौद्ध आणि पूर्वाश्रमीचे महार समाजातील लोकांचा अधिवास असलेल्या घरांच्या दगडी पायांचे जुने अवशेष अजूनही जिवंत असल्याचे पहावयास मिळत आहे.

या ठिकाणी 15 ते 20 घरे असल्याचे तेथील घरांच्या पायावरून दिसून येते. तर काही घरांच्या पायाचे अवशेष नामशेष झाले आहेत तर काही अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी या लोकांची पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे अवशेष देखील पाहायला मिळते.या गावठाणाच्या शेजारीच वीटा मातीचे कौलारू जुने देऊळ देखील आहे. मरी आईचे देऊळ असल्याचे येथील जुन्या लोकांकडून सांगितले जात आहे. या देवळाच्या वरील छप्पर पडले असून विटा देखील विस्कळीत झालेल्या पाहायला मिळतात.

गावठाणाला विशेष महत्व
या गावठाणावर वास्तव्य केलेल्या बौद्ध लोकांच्या शेतजमिनी देखील शिरवली हद्दीतील परिसराला लागून आहेत तर काही शेत जमिनी या वावोशी हद्दीत असलेल्या पाहायला मिळतात. शिरवली भागात असणार्‍या या गावठाणाची सरकार दप्तरी नोंद असल्याने बौद्ध समाजाचे आपल्या हक्काचे गावठाण असल्याच्या ऐतिहासिक दस्तऐवजामुळे या गावठाणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Exit mobile version