एकदिवसीय क्रिकेटमध्ये घडला इतिहास

एकटीने चोपल्या नाबाद 195धावा

। केप टाउन । वृत्तसंस्था ।

इंडियन प्रीमिअर लीग 2024 मध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी होत असताना रोज नवनवीन विक्रमांची नोंद होत आहे. तसेच वादळ काल दक्षिण आफ्रिकेत घोंगावले. श्रीलंकेच्या महिला संघाची कर्णधार चमारी अटापट्टूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये वादळी खेळीची नोंद करताना शेन वॉटसन, महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली या दिग्गजांना मागे टाकले. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने विजयासाठी ठेवलेल्या 302 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चमारीने एकटीने नाबाद 195 धावांची स्फोटक खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.

यावेळी आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 301 धावा उभ्या केल्या. कर्णधार लॉरा वोलव्हार्डने 147 चेंडूंत 23 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 184 धावा चोपल्या. लारा गुडॉल (31), मॅरिझने कॅप (36) व नॅडीन डे क्रेर्क (35) यांची तिला साथ मिळाली. पण, आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर चमारी उभी राहिली. तिने 139 चेंडूंत 26 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 195 धावा केल्या आणि श्रीलंकेला 6 विकेट्सने विजय मिळवून दिला.

निलाक्षिका सिल्वाने नाबाद पन्नास धावा केल्या. चमारी व निलाक्षिका यांनी 146 चेंडूंत 179 धावांची नाबाद भागीदारी केली. महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना चमारीने केलेल्या 195 धावा या सर्वोत्तम ठरल्या. यापूर्वी 2017 मध्ये मेग लॅनिंगने नाबाद 152 (वि. श्रीलंका) धावा केल्या होत्या आणि कालपर्यंत लक्ष्याचा पाठलाग करताना दीडशेपार धावा करणारी ती एकमेव महिला खेळाडू होती. महिलांच्या एकदविसीय क्रिकेटमधील ही तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. एमेलिया केरने 2018 मध्ये आयर्लंडविरुद्ध नाबाद 232 धावा केल्या होत्या. त्याआधी 1997 मध्ये बेलिंडा क्लार्कने डेनमार्कविरुद्ध नाबाद 229 धावा केलेल्या. चमारीने काल भारताच्या दीप्ती शर्माचा 188 धावांचा विक्रम मागे टाकला.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये (पुरुष/महिला) धावांचा यशस्वी पाठलाग करतानाची ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. ग्लेन मॅक्सवेलने 2023च्या एकदिवसीय विश्‍वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 201 धावा चोपल्या होत्या. चमारीने काल नाबाद 195 धावा करून शेन वॉटसन (185 वि. बांगलादेश, 2011), महेंद्रसिंग धोनी (183 वि. श्रीलंका, 2005) आणि विराट कोहली (183 वि. पाकिस्तान, 2012) यांना मागे टाकले.

Exit mobile version